मराठी बोलींचे सर्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

आईचा धाकटा भाऊ आणि आईचा मोठा भाऊ , आईच्या मोठ्या भावाची बायको आणि आईच्या धाकट्या भावाची बायको

डाउनलोड आईचा धाकटा भाऊ आणि आईचा मोठा भाऊ , आईच्या मोठ्या भावाची बायको आणि आईच्या धाकट्या भावाची बायको

नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी.

‘आईचा लहान आणि मोठा भाऊ तसेच आईच्या लहान आणि मोठ्या भावांची बायको’ हे नाते दर्शविण्यासाठी महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यात मामा आणि मामी हे नातेवाचक शब्द आढळून आले. याव्यतिरिक्त सदर सर्वेक्षणात मामा या शब्दासाठी मावळा, मावळो, मामू, मामो, मामूस, मामास, काकास, मामाजी, अंकल, पयतीव, मामोसा, फुवा, फुपा, बावा, तर मामी या नातेवाचक शब्दासाठी मामीस, मामीसा, ममानी, वाडाय, फुईस, फुस, फोई, मावळन, मावळीन, मामीजी, आत्या, आत्ती, मुमानी, मावळी, मयती, आत्तू, काकिस, फुया, फोची, मामीन, मामीश, चाची (मोठी मामी) इत्यादी शब्दवैविध्य मिळाले आहे. धोंगडे (१९९५:७६) यांनी नमूद केल्याप्रमाणे यापूर्वीच्या सर्वेक्षणात मामा आणि मामी हे शब्द मिळाल्याची नोंद आहे. कर्वे (१९५३:१४५,१६५) यांनी मावळण हा शब्द संस्कृतोद्भव असून तो ‘मातूलानी’ या शब्दापासून आलेला आहे, तसेच ‘मातूलानी’ हा शब्द संस्कृत ‘मातूला’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे. मातूला याचा संस्कृतातील अर्थ आईचा भाऊ असा होतो. मावळण हा शब्द कुठल्याही प्रकारच्या आत्ये-मामे भावंडांच्या लग्नसंबंधांचे सूचक नाही असे त्यांनी नमूद केले आहे.

सदर सर्वेक्षणात मामा आणि मामी या नातेवाचक शब्दासाठी मावळा आणि मावळण हे पर्यायवाचक शब्द म्हणून प्रामुख्याने लातूर, सोलापूर आणि नांदेड या कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांच्या सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने सापडत असून फोची हा नवापूर खांडबारा (नंदुरबार) येथे आणि वाडाय हा शब्द केवळ ठाण्यातील वांगणी येथे आदिवासी समाजात मिळतो. फुई हा शब्द पालघर, नाशिक, आणि रायगड जिल्हयातील काही गावात तर यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात आढळून येतो. तर फुवा आणि फुफा हे शब्द मामा या शब्दासाठी केवळ जळगाव जिल्ह्यातील दहिवंडी या गावी आणि वाशिममधील शिरपुती येथे मिळाला आहे. मामाजी आणि मामीजी हे शब्द नागपूर, वर्धा या जिल्ह्यांत अधिक प्रमाणात तर अमरावती, भंडारा आणि गोंदिया जिल्हयातील ठराविक भागात मिळाले आहेत. आत्या हा शब्द कोल्हापूरातील चंदगड, रायगड जिल्ह्यातील चिंचघर, पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुका आणि यवतमाळ जिल्ह्यातील कुर्ली गावी ध्वनिभेदांसह आढळून आला.

संदर्भ:

कर्वे, इरावती १९५३, किनशिप ऑर्गनायज़ेशन इन इंडिया, डेक्कन कॉलेज मोनोग्राफ सिरिज: ११, पुणे

धोंगडे, रमेश १९९५ (पुर्नमुद्रण२०१३) महाराष्ट्राचा भाषिक नकाशा(पूर्वतयारी), राज्य मराठी विकास संस्था, मुंबई.